गड कोट किल्ले.. पहावे ते सह्याद्रीचे
आचरणात आणु पहावे... ते कर्म थोर शिवरायांचे....
--श्रीकांत लव्हटे

Tuesday, November 30, 2010

|| किल्ले कर्नाळा ||


माहीती :

पनवेल कडुन मुबंईकडे येताना गोवा महामार्गावर एक सुळका येणा-या-जाणा-यावर डोळे काढुन उभा आहे... हो तोच कर्नाळ्याचा सुळका !! गेली कित्येक शतके, पनवेल बोर घाटातुन मुंबई चौल बंदराकडे होणा-या व्यापारी वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवुन हा किल्ला उभा आहे.
पनवेल परीसरात दोन मनोहारी सुळके - एक प्रबळचा सोबती, प्रबळगडवरुन दिसणारा, नावानुसार सुंदर कलावंतीण दुर्ग ! आणि दुसरा महामार्गावरच्याना खुणावणारा किल्ले कर्नाळ्याचा (उंची ४४५ मीटर)!!!
नवी मुंबईकरांना अगदी जवळचा किल्ला. एक दिवसाच्या ट्रेक साठी मस्त. वाट अभयारण्यातल्या जंगलातुन असल्याने भर उन्हातही ट्रेक करता येतो. मला तर हाकेच्या अंतरावर! बाईकला किक मारली की १५ मिनीटात पायथ्याला.... :)

पार्किंग पासुन चढाईला सुरवात करताच छोटा ओढा लागतो. पावसाळ्यानंतर गेलात तर थोडेफार पाणि नाहीतर दगडांनी भरलेला. नंतर पक्षी अभयारण्यातुन थेट किल्ल्याला वाट जाते. घनदाट झाडी असल्याने ब-यापैकी थंडावा असतो. निरनिराळ्या पक्ष्यांची, झाडांची निरीक्षणे करत, जंगलातुन, दाट सावलीतुन चढण संपवली म्हणजे तुमचा पहीला टप्पा फत्ते झाला. जंगलात ब-याच पाउलवाटा आजुबाजुला जातात; जंगलाच्या निरनिराळ्या क्षेत्रात, पक्षी निरीक्षणाच्या. पण आपल्याला किल्ल्याकडे जायचे असल्याने चढती वाट समोर ठेउन जास्त उजवे-डावे न करता चढावे.

चढण संपली की लागते मोठा सपाट माळ, डोक्यावरचे जंगलाचे छप्पर मागे टाकलेले आभाळ आणि उजव्या हाताकडे कर्नाळ्याचा दुर्ग!!

इथुन साधारण २००-२५० मीटर्स वर कर्नाळा सुळका. एकदा का किल्ला नजरेच्या टप्प्यात आला की पाय आपोआप गती घेतात.

थोड्याच वेळात उजव्या हाताला कर्नाईदेवीचे छोटेखानी मंदीर लागते. सिहांवरती आरुढ, हातात तरवार, गदा असलेली मुर्ती रेखीव आणि सुबक आहे आणि विशेष म्हणजे भग्नावस्थेत नाही. मुर्ती अखंड पाषाणात घडवली आहे.

दर्शन घेउन पुढे जाताच स्वागताला सज्ज असतो पहीला दरवाजा ... दोन बुरुजात, बारीक कमान (जवळपास मोडकळीस आलेली) असलेला...इथुन मागे वळुन आपण आलेली पायवाट बघण्याची मजा काही औरच!! :)  दगडी पाय-यांवरुन जरा पुढे सरकले की मुख्य दरवाजा लागतो. हा त्यामानाने मजबुत, भक्कम आणि चिंचोळ्या दगडी जिन्याने गडावर पोहोचवणारा आहे. एका वेळी एकच माणुस वरती यावा अशी आतुन रचना.

हा दरवाजा पार केला की आपण पोहोचतो गडमाथ्यावर आणि सुळक्याच्या पायथ्याला! तिथे एका घरासारख्या इमारताचे अवशेष सुस्थीतीत आहेत. ती नक्कीच जास्त जुनी ईमारत नाही. तिच्याबद्दल जास्त माहीती मिळाली नाही (कोणास माहीत असल्यास कमेंट मध्ये कळवावी).


आता पहायचा तो कर्नाळ्याचा सुळका! नीट पहा... हा नुसता सुळका नव्हे, शतकोनशतके उन-वारा-पाऊस-थंडी सोसत, चहुबाजुनी परीघालगत पोटात खोदीव पाण्याची टाकी जपत आणि शिवकालीन, कालपुर्व, शिवकालोत्तर इतिहास पिढ्यापिढ्यांना सांगत तो अखंड उभा आहे. एकुण उंची ४७५ मीटर. "जैत रे जैत" गो. नी. दांडेकरांची कादंबरी आणि त्यावरील चित्रपटातल्या "लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला" गाण्यातला डोंगर तो हाच! साधारण ३०-३५ मीटर उंचीचा सुंदर सुळका म्हणजे पुरुषार्थाला आव्हान. वर चढायला दगडात ब-यापैकी खोबणी आहेत. सुळक्याच्या माथ्यावर शिवदुर्गप्रेमी किंवा कोण्या hikers संघटननेने पत्र्याचा भगवा ध्वज उभारला आहे. ब-याच लांबुनही तो व्यवस्थीत दिसतो. सुळक्याच्या पोटात सर्व बाजुंनी पाण्याची टाकी खोदली आहेत. कातळाच्या आत टाक्यांत नैसर्गिक पाण्याचा साठा करण्याचे २ फायदे : उन्हापासुन पाण्याचे बाष्पीभवन होत नाही आणि कातळात जमिनीखाली असल्याने शीतलता टिकुन राहते.

सुळका समोर ठेउन डाव्या बाजुला उतरले की आपण दुस-या भक्कम दरवाज्यातुन गडाच्या माचीवर पोहोचतो. हा दरवाजा दगडी चि-यांच्या बुरुजात चपखल बसवला आहे. दरवाज्यात शिरायची वाट चिंचोळी आहे. वाटेत एक  देवडी आहे. दरवाज्याचे मुख खालच्या पातळीवर आहे म्हणचे साधारण १० पाय-या उतरल्या की आपण दरवाज्यात येतो. दरवाज्यावर शुभपुप्षे व दोन शरभशिल्पे आहेत. आतिशय कोरीव आणि आजही सुस्थीतीत!! दरवाज्याच्या पुढील पाय-या ढासळल्याने काळजापुर्वक उतरावे. दगडी चि-यांत कापलेली चौकट न घडीव कमान पाहुन कारागिराचे आपण मनोमन कौतुक करतो.

दरवाजा आपल्याला माचीवर सोडतो. थोडीफार ढासळलेली तटबंदी आणि विर्स्तीण माळ. तटबंदीत जागोजाग कडाबिनींसाठी (Guns) जागा आहे. या माळावरुन मागे सुळका सुरेख  दिसतो. त्याच्या पार्श्वभुमीवर छायाचित्रे घेण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. इथुन परततांना सुळक्याच्या कडेने एक ढोरवाट खालीकडे जाताना दिसली. कदाचीत तिने सुळक्याच्या थोड्या मागे जाता येइल, आम्ही गेलो नाही.


इतिहास :


१२-१३ व्या शतकातला या किल्याचा जन्म. तेव्हा यादवांनी (देवगिरी राजधानी) येथे राज्य केले. १४  व्या शतकात दौलताबादच्या मुस्लिमांनी हा किल्ला ताब्यात घेतला. १६ व्या शतकात येथे निजामशाही नांदली. १६७० मध्ये कर्नाळ्याचे भाग्य उजाडले. कर्नाळा स्वराज्यात आला. किल्ल्यावर मराठेशाही आली. या सर्दंभात प्र. के. घाणेकरांनी एका पुस्तकात लिहीलय:
मराठ्यांनी पनवेलपासच्या डोंगराला प्रथम वेढा घातला. मग फळ्या व चिखलाच्या भिंती बांधत, त्या आडुन हल्ला करत ते तटाशी पोहोचले आणि मग कर्नाळा घेतला. याची मराठी कागदपत्रातली नोंद अशी : " शके १५९२, साधारण संवत्सर. आषाढ शु. १४ ला कर्नाळा घेतला"
कर्नाळा पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेला, मग पुन्हा मराठ्यांनी जिेकला. मग आंग्रे, पेशवे आणि सरतेशेवटी इंग्रज असे सत्ताधिश झाले. १८१८ मध्ये सर्व किल्ल्याविरोधी उघडलेल्या मोहीमेत कर्नल प्रार्थरने कर्नाळा जिेकला.




भौगालीक स्थान


18°52'53.51"N  73°07'07.33"E






















कर्नाळ्याच्या वाटेवर 
मुबंई वा पुण्यावरुन पनवेलला पोहोचायचे. पनवेलवरुन गोव्याकडे जाणा-या कोणत्याही बसने कर्नाळा अभयारण्याला उतरता येते. स्वत:ची गाडी असेल तर पनवेल वरुन मुबंई-गोवा महामार्गाने निघायचे की थोड्याच वेळात अभयारण्याला पोहचतो. पनवेलवरुन १३ कि.मी. अंतर! 
अभयारण्याच्या जागेत अल्प दरात पार्कींग उपलब्ध आहे. पार्कींग समोरुनच अभयारण्यातुन वाट गडाकडे जाते.




कर्नाळा छायाचित्रे 
http://www.orkut.co.in/Main#Album?uid=3339205199228053604&aid=1285537900



Monday, November 8, 2010

|| किल्ले कोरीगड उर्फ कोराईगड ||




माहीती :

लोणावळा आणि पालीला जोडणा-या साव घाटाजवळ वसला आहे किल्ले कोरीगड!! आंबवणे आणि पेठ शहापुर ही पायथ्याची गावं, पैकी आंबवणेकडची वाट आता ट्रेकर्ससाठी बंदच... आंबवण्याकडुन वर जाणारी वाट जरा अवघडच! पण सध्या झालेल्या Ambey Vally प्रकल्पाने आंबवणे परीसर आपल्या ताब्यात घेतलाय आणि तेथे खाजगी मालमत्ता म्हणून परवानगीशीवाय जाता येत नाही L मग राहता राहीली पेठ शहापुरने वर जाणारी  वाट. वाट एकदम सोपी! नवीन ट्रेकर्ससाठी उत्तम. थोडे टेकडीवजा जंगल तुडवले की दगडी पाय-या (अलीकडे घडवलेल्या) लागतात. त्या अगदी थेट दरवाज्यात नेऊन सोडतात.

किल्लाचे वैशिष्ट म्हणजे अखंड तटबंदी!!  अगदी दुरुनही स्पष्ट दिसणारी ती रेघच ओळख पटवुन देते कोरीची ९५० मीटर उंची.... चढाई सुरु केली की थोड्याच वेळात उजव्या हाताला दोन खोल्यांची गुहा आणि गणेशमंदीर लागते.  अजुन थोडे पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजुस पहारेक-यांच्या गुहा आहेत. डाव्या बाजुची मोठी आणि रस्त्याला चिटकुन आहे तर उजव्या बाजुची खुपच छोटी आणि आडवळणी आहे.

सुमारे अर्धा-पाउण तासात आपण दरवाज्यात पोहोचतो... लढाऊ गणेश दरवाजा... दरवाज्यावर शुभपुष्प आहे, सुस्थीतीत. दरवाज्यातुन आत गेल्यावर डाव्या बाजुच्या तटबंदीने गड फिरायला सुरवात करावी. गडमाथा फारच मोठा... विर्स्तीण पतरलेला मोठ्या पाठारासारखा सलग आणि सपाट.... गडावर एकुण ६ तोफा पैका लक्ष्मी तोफ सर्वात मोठी. एका ठिकाणी तटाच्या खाली मोठ्या भिंतींचे अवशेष आहेत. बहुतेक दरवाजा वा मोर्चा असावा.

   

तिथुन पुढे लागते लक्ष्मी तोफ! तिला व्यवस्थीत लोखंडी तुळ्यांवर ठेवली आहे. बाकी तोफा अशाच गडमाथ्यावर पहुडल्या आहेत. लक्ष्मी तोफेखालीच आहे दुसरा दरवाजा (नाव ज्ञात नाही ). तोफेखाली तट उतरुन दरवाज्यापर्यत जाता येते. दरवाज्यातुन गडाखाली जायला पायवाट नाही. दगडे नी जंगलाने तो भाग व्यापलाय.

माथ्यावर २ मोठी तळी आहेत. बेडकांनी भरलेली J आणि बाजुलाच कोराईदेवीचे मंदीर



मंदीरापुढे दगडी दीपमाळ आहे. मंदीर आता छान बांधुन काढल्याने त्याच्या आवारात निवांत बसता येते. कोराईबद्दल असे वाचलय की मुंबईच्या मुंबादेवीचे दागीने हे कोराईचे आहेत. गडाच्या पश्चीम कड्याला छोटेखानी गुहा आहेत. तिथेच जवळच एक विष्णुची मुर्ती आहे (मी पाहीली नाही L).

इतिहास :

याला कुवांरगड सुध्दा म्हणतात. १६५७ मध्ये लोणावळा भागातील लोहगड, विसापुर, तुंग, तिकोना सवे हा किल्ला स्वराज्यात आला. १८१८ मध्ये जेव्हा इंग्रजांनी किल्ले तोडण्यास सुरवात केली तेव्हा कर्नल प्रॉथरने या गडावर तोफा लावल्या. अखेर १४ मार्च १८१८ ला एक गोळा रोरावत दारुखान्यावर पडला आणि मराठ्यांनी किल्ला सोडला. तेव्हा कोराईदेवीचे दागीने काढुन मुंबई पाठवण्यात आले. हेच दागीने आजही मुंबईच्या मुंबादेवीवर आहेत.


भौगालीक स्थान:

 18°37'6.00"N  73°23'10.83"E

कोरीगडच्या वाटेवर:
मुबंई अथवा पुण्याहुन लोणावळ्याला यायचे. तिथुन पेठ शहापुर आहे अवघे २५ किमी. स्थानिक वाहनाने जाता येते. स्वत:ते वाहन असल्यास लोणावळ्यातुन INS Shivaji संस्थेच्या रस्ताने पुढे निघायचे. तिथुन पुढे ambey vally च्या दिशेला पेठ शहापुर गाठता येते.

कोरीगड छायाचित्रे :



Saturday, September 25, 2010

|| किल्ले तोरणागड ||







माहीती :

तोरणा !! खरेतर महाराष्ट्राच्या मातीत वाढणा-या कोणालाही शिवाजीराजे आणि तोरणा याबाबत सांगण्याची गरजच नाही..कारण श्वासागणिक इथले डोंगरमाथे, घाटवाटा, नद्या, अवघे आभाळ, इथला कण नि कण त्याला इतिहास सांगत असतो... याच इतिहासाचे, याच स्वराज्याचे, याच श्रींच्या इच्छेचे वाजतगाजत पहीले तोरण मिरवले ते तोरणागडाने...!!
पुणे जिल्हातील सर्वात उंच किल्ला ४६०६ फूट!!


इतिहास :
१६४७ मध्ये शिवरायांनी तोरणा स्वराज्यात आणला. त्याच्या प्रचंड पसरलेल्या विस्तारामुळे त्याचे नाव "प्रचंडगड" ठेवण्यात आले. नंतर तोरण्याच्या दुरुस्तीमध्ये खणताना २२ हंडे भरुन सोन्याच्या मोहरा सापडल्या. त्या जागीच तोरणाईची स्थापना करण्यात आली. हेच धन वापरुन समोरच्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर पहीली राजधानी "किल्ले राजगड" आकारास आली! नंतर १७०४ मध्ये महाराजांच्या पश्चात अमानुल्लाखानाने (मुघल) तोरणा जिेकला. James douglus wrote about Torna fort : It was Shivajee's first conquest, the nucleus around which all the other clustered making it virtually the cradle of Maratha Empire, which shocked the throne of the great Mogal. it has seen many bloody battles. if Sinhgad is Lion's den then Torna is Eagle's nest!!


भौगालीक स्थान:

18.267989North,73.613591East





























तोरण्याच्या वाटेवर:

पुण्याहुन वेल्हा एस् टी पकडुन तोरण्याला जाऊ शकतो. वेल्हावरुन कोठी-बिनी दरवाज्या
ने गडावर जाता येते.
पुणे केळद एस् टीने भट्टी गावात उतरुन मग बुधला माचीला चढता येते. राजगड-तोरणा असा ५-६ तांसांचा टेक करता येतो..

गडावर हे चुकवु नका:
बिनी दरवाजा, कोठी दरवाजा, कोकण दरवाजा, चिणला दरवाजा, चित्त दरवाजा
मेंगाईदेवी मंदीर, तोरणाई मंदीर
बुधला माची, झुंजार माची

तोरणा छायाचित्रे :


Wednesday, September 22, 2010

|| किल्ले वितंडगड उर्फ तिकोना ||









माहीती :


पवन मावळात वसलेली तुंग-तिकोना ही जोडगोळी! पवना तळ्याचे जणु काही दोन बाजुला रक्षण करायला उभे ठाकलेले दोन कातळी खांबंच....त्यातला तिकोना म्हणजेच वितंडगड !!
लोणावळा परीसरात ४ किल्ल्यांची मोतीमाळ... लोहगड, कठीणगड (तुंग), वितंडगड (तिकोना) आणि विसापुरचा किल्ला...त्यातला तिकोना म्हणजे पाचूसारखा तिन्ही वाजुने तासुन काढलेला... नावाप्रमाणेच त्रिकाणी अगदी इजिप्तच्या पिरॅमिडसारखा....
साधारण ३५०० फूट समुद्रसपाटीपासुन उंची... पायथ्याशी तिकोना पेठ वसलेली...नवीन Trekkers साठी उत्तम...


इतिहास :

स्वराज्यात येण्यापुर्वी तिकोना निजामशाहीत होता. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी निजामाविरुध्दच्या कोकणस्वारीत लोहगड, माहुली, विसापुरचा किल्ला, कर्नाळा सोबत
तिकोना जिेकला.. १६६५ मध्ये पुरंदरच्या तहामध्ये तिकोना देण्यात आला नि किल्ल्यावर मोगलाई आली... कालांतराने पुरंदरच्या तहीतल्या इतर किल्ल्याप्रमाणे तिकोनाही मराठ्यांनी स्वराज्यात आणला !!


भौगालीक स्थान:

18.631677North ,73.512794East




तिकान्याच्या वाटेवर :

मुंबई-पुणे दु्तगती मार्गावर कामशेतला पोहोचायचे. मुबंईवरुन ११० किमी व पुण्याहुन ८५ किमी ... कामशेतवरुन तिकोना अवघा ८ किमी...कामशेतला कामशेत-पवनानगर रोडला वळाचये... मग थेट पवना तळ्याच्या बाजुने मस्त वळणदार रस्तावर गाडी फिरवत तिकोना पायथा !!
बसने कामशेत - काळे कॉलनी - तिकोना पेठ असा प्रवासही करता येतो..


तिकोना छायाचित्रे :


Disover Mahrastra Tikona Episode : http://www.youtube.com/watch?v=ZVFZf_nyfbA


Friday, August 20, 2010

Locations of visitors to this page